सोलापुरात ‘हा’ भोंगा नित्य वाजला पाहिजे


सोलापुरात पहिला भोंगा पोहोचला अशा अर्थाची बातमी जवळपास सर्वच वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली, ज्यांना याचे कौतुक आहे त्यांनी आनंद व्यक्त केला. बाकी बरेचसे तटस्थ राहिले.

माझ्या मते असला कुठलाही प्रार्थनास्थळावरचा भोंगा इथे पोहोचला नाही तरी चालेल वा जे भोंगे इथे आधीपासूनच विविध प्रार्थनास्थळांवर वाजताहेत तिथले सर्व भोंगे बंद पडले तरी चालतील वा बंद केले तरी चालतील मात्र एक भोंगा इथे नित्य वाजला पाहिजे तो म्हणजे इथल्या कापड गिरण्यांवरचा भोंगा ! असेल धमक तर गिरण्या चालू करून त्यावरचे भोंगे सुरु करा !

एके काळी गिरणगाव असणाऱ्या सोलापूरमध्ये जामश्रीचा अपवाद वगळता सर्व कापड गिरण्या एकेक करून बंद पडत गेल्या. कॉंग्रेस, भाजप, एनसीपी, शिवसेना अशा सर्वच पक्षांनी याचे एक क्वेश्चनकार्ड केले आणि त्यावर आपली पोळी जमेल तितकी भाजून घेतली.

लोकसंख्या प्रमाण घटलेले राज्यातले हे एकमेव शहर आहे, इथली तरुण शिक्षित मंडळी पुणे, मुंबई, औरंगाबाद, बेंगळूरू, हैदराबाद इथे नोकरीसाठी जातात. आता तर दहावी बारावीपासूनच मुले या शहरांतशिक्षणानिमित्त राहण्यास जातात आणि नंतर तिथलीच होऊन जातात.

दर शनिवारी रविवारी वा सणवाराला, उत्सवाला सोलापूरकडे येणाऱ्या ट्रेन्स फुल्ल असतात. रस्ते गर्दीने भरून वाहत असतात. ही मुले एकेक करून आपल्या कुटुंबियांनाही तिकडे नेताहेत. ही मंडळी त्यांच्या गावी परततात तेंव्हा शहर पुन्हा ओस बकाल पडलेले असते. बाजारपेठा मलूल होतात.

इथला विणकर उद्योगही बऱ्यापैकी आंध्र तेलंगणात शिफ्ट झालाय. कुणी काही वल्गना केल्या की आर्मीसाठी इथले कपडे वापरू तर कुणी म्हणाले इथल्या चादरी लाखोंच्या संख्येत राखीव दलांना पुरवू. कुणी म्हणाले इथे सुविधा देऊ करकपात करू जुने दिवस परत मिळवून देऊ ! पण निराशेशिवाय कुणीच काही दिलं नाही. परिणामी हातमागांची धडधड लोप पावू लागलीय.

शहराचा पूर्व भाग निव्वळ विड्या वळणाऱ्या स्त्रियांच्या अर्थकारणावर तगून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ! किती भीषण आणि वाईट चित्र आहे ना हे !

इथल्या आजूबाजूच्या एमआयडीसीमध्ये प्रिसिजन शाफ्टचा सोलापुरी अपवाद वगळता नामांकित मोठी कंपनी एकही नाही. तेच उद्योग तेच व्यवसाय !

मोठ्या दिमाखात सुरु झालेले ‘त्रिपुरसुंदरी’ हे पंचतारांकित हॉटेल सील झाल्याला आता दशक होईल.
आसपास मोठे उद्योगधंदे नाहीत की कुठले रोजगाराचे व्हिजन नाही,
उदास वाटावे असा भवताल असताना इथले सर्वपक्षीय मंडळी एक उद्योग नित्य करत असतात, प्राण गेला तरी बेहत्तर मात्र त्यात खंड पडू देत नाहीत, तो उद्योग म्हणजे जयंत्या पुण्यतिथ्या उत्सव आणि मिरवणुका !

इथे जितक्या मिरवणुका निघतात तितक्या देशात कुठे निघत नसाव्यात.
सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या इथे अभिनिवेशाने आणि इर्षेने साजऱ्या केल्या जातात, तेही त्या महापुरुषांचे विचार पायदळी तुडवून !
काही राजकारण्यांचा आणि गल्लोगल्ली असणाऱ्या तरूण मंडळांचा हा बारमाही धंदा होऊन बसला आहे.

इथल्या तरुणांची लायकीच पुढाऱ्यांनी ही केली आहे याचे नवल वाटत नाही कारण दारू मटन परवडणार तरी कसे ? पार्टी सेलिब्रेशन करणार तरी कसे ? गुटखा तंबाखू जर्दा यांचा खर्च भागवणार तरी कसा ? मग कुणाचे तरी स्टीकर रिक्षाला लावायचे आणि त्याचा मुळव्याध हातावर उगाळत त्याच्या नावाने जयजयकार करत फिरत रहायचे !

इथे चांगलंही काही घडत असतं, नाही असं नाही मात्र त्याचे श्रेय वैयक्तिक पातळीवरचे असल्याने शहरातील कुण्या लुंग्यासुंग्या राजकारण्याची खुशामत करण्याची गरज कदापिही नाही.

अशा आमच्या या शहरात कुण्या राजकारण्याने भोंगा पाठवला त्याची बातमी झाली.
कोणत्याही पत्रकारास याचा विविध दृष्टीकोनांतून रिपोर्ताज करावा वाटला नाही.
असो…

ज्या चाळीत हा भोंगा आला त्या जुनी पोलीस लाईन परिसरात माझे बालपण गेले आहे. इथे कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गात मोडणारी मंडळी बहुतांशी आहेत. परिसरात शिक्षणाची ओढ नाही. सारी श्रमिक मंडळी. खाजगी नोकरदार आणि छोटेमोठे व्यवसाय असणारे काही लोक, रिक्षाचालक मालक अशी मंडळी या सर्व परिसरात राहतात.
इथून जवळ असणाऱ्या हजरतखान चाळीत तर याहून वाईट परिस्थिती आहे. तिथे मस्जिद आहे आणि त्यावर भोंगाही आहे. इथल्या कुठल्याच माणसाला मोठं व्हायचं नाही की कुटुंबाचा विकास घडवून आणायचा नाहीय.
हा जो भकास सोलापुरी वनवास आहे त्याला स्वर्ग समजून राहण्यासाठी राजकारण्यांचे पाठबळ आहेच आणि जोडीला धर्माचे राजकारणही सहायक आहेच !
अशी मंडळी हे राजकारणी मंडळींचे गिऱ्हाईक असतात,
त्यांनाही झेंडे घेऊन नाचणारे कार्यकर्ते हवे असतात,
गळ्याच्या शिरा ताणून घोषणा देणारी पोरे हवी असतात.
सगळ्याच हातांना रोजगार मिळाला सर्वच घरे सुखी झाली तर ही कामे कोण करणार ?
भोंगा कोण मागवणार आणि आपापल्या धर्माच्या प्रार्थनास्थळाचा माज माथी कोण मिरवणार ?
पुढाऱ्यांच्या मुलांना ही कामे वर्ज्य असतात,
ते कुठे तरी देशविदेशात उच्च शिक्षण घेऊन पैशाचा छापखाना खोलून बसतात.
त्यांना हवं असणारं मनुष्यबळ तुमच्या आमच्या घरातून पुरवलं गेलं नाही तर त्यांचा पोटपाण्याचा धंदा बंद पडेल ना !
पुनश्च असो..

आमचं घर पूर्वी याच भागात निर्मलनगर, गोयल प्लॉट इथे होतं.
तिथे किमान पन्नास वर्षांपासूनचे हनुमान मंदिर आहे जिथे आम्ही भावंडे किशोरवयात जायचो.
सीताssssरामssss या उद्घोषाचा आनंद घेऊन रात्रीच्या आरतीत सामील व्हायचो. ही आरती रात्री साडेआठच्या सुमारास व्हायची.
या हनुमान मंदिरात वाराणसी, गया, प्रयाग आदी ठिकाणाहून साधू येऊन राहत असत. बहुतांशी हिंदी भाषिक साधू इथे वास्तव्यास येत असत.
संध्याकाळी आरती झाल्यावर प्रसाद वाटप असे.
एक बालब्रम्हचारी साधू सर्व देखरेख करत असत.
या मंदिरात रोज सकाळी हनुमान चालीसा भोंग्यावरून (लाऊडस्पिकर) वरून लावली जाई.
इथे खूप मोठाली झाडे आहेत त्यांच्या फांद्यात उंचावर भोंगा असल्याने आवाज घरात येई. मस्जिदीच्या अजानचाही आवाज येई.
त्यांच्या वेळा संपल्या की पुन्हा परिसर शांत होई.
हे जे काही ईशस्मरण असायचं त्यात मस्ती नव्हती की कुठला माज नव्हता. त्यांचे आवाजदेखील बारीक असत.

जिथे भोंगा पाठवला गेलाय त्या जुनी पोलीस लाईनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असणारा रोज हनुमान चालीसा वाजवणारा हा भोंगा भावभक्तीचा असल्याने त्याचा शोध घ्यावा असे कुणालाच वाटले नसावे.
मात्र कुणीतरी परगावहून भोंगा पाठवला त्याची दखल घ्यावी वाटली कारण तो पाठवण्यामागचा हेतूच कुणाची तरी जिरवण्याचा आहे आणि स्वतःला मिरवण्याचा आहे !

इथे इतका सारा उदासीन आणि म्लान भवताल असूनही सारे गुण्यागोविंदाने नांदते आहे, त्यात विष कालवू नका !
काही द्यायचेच असेल तर इथल्या राजकारण्यांना सद्बुद्धी लाभण्यासाठीच्या शुभेच्छा द्या. बाकी काही देऊ नका, जितके वाट्टोळे झालेले आहे ते पुरेसे वाटत नाही काय ?
काही पाठवायचेच असेल तर रिकाम्या हातांना काम पाठवा, मिटत आलेल्या बाजारपेठेसाठी ग्राहकांची रौनक पाठवा, भुकेल्या पोटांसाठी अन्नाचे घास पाठवा, अर्धउघड्यांसाठी कपडे पाठवा,
आणि जमलेच तर पडण्याच्या बेतात आलेल्या वृद्ध घरांचे तरूण आधार परत शहरात पाठवा !

– समीर गायकवाड


more recommended stories